Wednesday, 26 July 2017

जीवनाचे ध्येय....


:-अभिजीत रा.साबळे (खेडलेझुंगे)
abhisabale09@gmail.com

एवढ्याश्या आयुष्यात खूप काही हवं असतं
खूप काही हवं असतं पण पाहिजे ते मिळत नसतं
पाहिजे ते मिळालं तरी त्यातही काही कमीच असतं
चांदण्यांनी भरून सुद्धा आभाळ रितचं असतं...
असे जरी असले तरी,
अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन अशा किनारा तुला पामराला |
अशी इच्छाशक्ती दुर्दम्य ध्येयवाद हे मानवी जीवनाला मिळालेले वरदानच आहे.ध्येयवादी मानवी जीवनाला बंधन येते.बंधनाशिवाय विकास होत नाही व संयमाशिवाय सिद्धी नाही.म्हणूनच प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी ध्येय हवे.ज्याच्या जोरावर उदार होवून लढू असे काहीतरी निशाण हवे.
आपण जर एखाद्याला विचारले तर तो सांगतो मला डॉक्टर,वकील,इंजिनियर,शिक्षक व्हायचय!पण हे ध्येय जीवनातील विशिष्ट वयापर्यंतच सिमित असते.त्यातही स्वार्थच दडलेला असतो.इच्छा वा ध्येय पूर्ण झाल्यावर पैशाच्या जोरावर राजा कदाचित ययाती सुद्धा होवू शकतो.कारण ध्येय हे फक्त जीवन निर्वाहासाठी व उपभोगासाठीच असते.I can earn my bread असे झाले म्हणजे जीवनातील ध्येय पूर्णहोत नाही.कारण ‘आहार निद्राभय मैथुनं च’ ह्या गोष्टी पशु पक्षी सुधा करतात.मग त्यांच्यात व आपल्यात फरक तो काय? तर आपल्याला धर्म (मानवता) असतो हाच मोठा फरक असतो.
कमळाच्या पानांवरीलपाण्याचा थेंब ज्याप्रमाणे केव्हाही घरंगळून नष्ट होण्याची शक्यता असते.त्याचप्रमाणे मानवी जीवन देखील केव्हा नष्ट होईल हे सांगताच येत नाही.म्हणूनच जीवनाचे सार जे आपणास आवडते ते करण्यात नाही तर जे आपण करतो ते आवडण्यात आहे.व्यक्तिमत्वाचा विकास,चारित्र्याची घडण,स्वसंस्कृतीची ओळख ह्या जीवनविकासाकडे नेणाऱ्या गोष्टीच जीवनातील ध्येय बनू शकतात म्हणजे What is life?How to live life? हे पूर्णतः समजून घेवून तसे गुणवान शक्तिशाली व्यक्तिमत्व बनवणे हेच माझ्या जीवनाचे ध्येय आहे.
जीवन जर कर्तव्य असेल तर एकच गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे Men are not born they are made माणुसकी,माणसाचे प्रेम हे एखाद्या धरतीसारखे असते अगोदर एक दाणा पेरावा लागतो.तेव्हाच धरती दाण्यांनी टिच्चून भरलेलं कणीस देते.माणूसही तसाच असतो.एक प्रेमाचा शब्द कोणी दिला तर त्याच्यासाठी प्रेमाची शब्दगंगा मुक्तपणे उधळायला तो तयार होतो.म्हणून प्रथम स्वतः माणुसकी दाखवली पाहिजे,स्वतः झुकले पाहिजे
‘माणूस म्हणजे पशु नसे,हे ज्याच्या हृदयावर ठसे,
नर नारायण तोची असे’
मी माणूस आहे ह्याची जाणीव जेव्हा होईल तेव्हा आत्मगौरव वाढेल,अन जगाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलल्यामुळे परसन्मान वाढेल,माणूस जन्माला येताच असंख्य अतूट नात्यांनी बांधला गेलेला असतो.जीवनाच्या या वाटचालीत जुने धागे तुटतात व नवे निर्माण होतात.पण ह्या नव्या जुन्या धाग्यांचा गोफ त्याला सतत गुंफतच रहावा लागतो.ह्या गुंफण कलेतील धाग्यांची जपवणूक करण्यातच खरी माणुसकी आहे.माणसाशी असलेले माणसाचे नाते समजून घेणे हीच जीवन जगण्याची खरी कला आहे.मी मोठं होवून माझं करियर करेन.चांगल्या हुद्यावर नोकरी करेन असे ध्येय असेल तर ते वयाच्या ३० वर्षापर्यंतच सिमित राहते.पण नंतर मात्र आपण काहीच केले नाही याची जाणीव होते
म्हणूनच ध्येय हे उच्च असले पाहिजे आकाशाला भिडणारे पण पाय मात्र स्थिर जमिनीवर टेकलेले असावेत.ज्याप्रमाणे शेतकरी आकाशाकडे नजर लावून बघत राहतो पण त्याचे पाय मात्र जीवन व्यवहारात पक्के रोवलेले असतात असे ध्येय हवे ज्याप्रमाणे जीवन जगण्यासाठी तर मन विकसित करण्यासाठी प्रेम,भाव ,आपुलकी,आत्मीयता यांची नितांत गरज असते.कारण मनुष्य कोट्यावधी मैल दूर असणारे तारे दुर्बीणीने पाहू शकतो पण स्वतःच्या टीचभर हृदयाचा तळ त्याला शोधून काढता येत नाही.परंतु कुणी देव म्हणो! कुणी दैव म्हणो!कुणी निसर्ग म्हणो!कुणी योगायोग म्हणो!पण जिला माणसाच्या सुखदु:खाशी काही कर्तव्य नाही अशी अंध,अवखळ,शक्ती माणसाला माणसाशी जोडीत असते.
कधी रक्ताच्या नात्याने,कधी गरजेच्या नात्याने,कधी मैत्रीच्या तर कधी प्रेमाच्या नात्याने.......वादळी समुद्रात फळकटाच्या आधाराने तरंगणारी माणसे जशी लाटांमुळे एकत्र येतात तसेच या अफाट जगात घडते.जीवनचक्राच्या या अखंड भ्रमंतीत माणसाला एकच गोष्ट करता येण्यासारखी आहे.दुसऱ्या माणसाशी जडलेले नाते नं विसरणे त्याचे जीवन फुलावे म्हणून जे जे करता येईल ते ते करणे.....
म्हणूनच मला सुद्धाजीवनात स्वार्थी ध्येय ठेवायचे नाही.कारण भंग स्वप्नांच्या तुकड्यांना कवटाळून मला जीवन व्यतीत करायचे नाही.
केव्हा होईल जीवन माझे निर्मळ वाऱ्यापरी
हूर हूर दाटली हीच एक अंतरी
:-अभिजीत राजेंद्र साबळे
                                      

2 comments:

  1. तू म्हणतोस आपल्याला धर्म (मानवता) असतो हा फरक. पण मानव व अमानव यात खरा फरक म्हणजे कार्य-कारण भावाचा विचार करणे. या विचारातूनच मानव आज एवढी प्रगती करू शकला व अजूनही करीत राहील फक्त मानवतावादी विचारातून फक्त सद्भाव उत्पन्न होतात पण विज्ञान तंत्रज्ञान व व्यवहार यातूनच प्रगती होते मानवतावादी विचारातून फक्त त्या प्रगतीवर योग्य अंकुश ठेवता येतो.

    ReplyDelete
    Replies
    1. विज्ञान तंत्रज्ञान मानवी जीवन अधिक सोपे व अधिक खुले करण्यास मदत करते.ते मानवाचे मदतनीस आहे.परंतु या मदतनीसाचा योग्य वापर मानवता धर्म जागृत असेल तरच होईल.

      Delete